


या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १६) विधान भवनाच्या पायऱ्यांवर खेडचे आमदार बाबाजी काळे, मावळचे आमदार सुनील शेलके आणि शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सरकारविरोधात निषेध आंदोलन करत संताप व्यक्त केला. त्यांना शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी दमदार साथ दिली. चाकणमध्ये जनआंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला विधानसभेत बळ देत आमदार बाबाजी काळे यांनी सरकारला ठाम शब्दांत सुनावले की, हे प्रश्न मी विधानसभेत वारंवार मांडतोय, पण तरी सरकारचे दुर्लक्ष सुरू आहे. टेंडर प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल याची हमी नाही. तोपर्यंत खड्डे बुजवा, साईड पट्टी सुधारून रस्ते सुसज्ज करा. अन्यथा शासनाला अजून किती बळी हवेत याचे उत्तर द्यावे लागेल.आमदार काळे म्हणाले की यात आजवर शेकडो अपघात बळी झाले आहेत. ही समस्या केवळ चाकणपुरती नाही. या ट्रॅफिक जाम मुळे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मुबंई येथील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीस गती द्यावी लागेल. शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवून रिंगरोडची प्रक्रिया गतीमान करावी. शासनाने तातडीने खड्डे बुजवले नाहीत, साईड पट्टी सुधारली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू. चाकण व पंचक्रोशीच्या जनतेच्या हक्कासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार काळे यांनी दिला