

एकल माता यांचा स्त्री सन्मान सोहळा व हळदीकुंकू उत्साहाने संपन्न
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” जयंतीनिमित्त क्रांतीज्योती प्रतिष्ठान चाकण व अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण शाखा आयोजित रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी एकल माता स्त्री सन्मान सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी 50 महिला सहभागी होत्या. त्यामध्ये पाच एकल माता महिलांचा गौरव चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सन्मानित महिला रीना जाधव,सुनीता शेवकरी, यांना सन्मान स्वीकारताना अश्रू अनावर झाले. भारती पाटील, कमल सोनवणे, कल्पना नाणेकर या समानार्थी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
अनिस चाकण शाखा व क्रांतीज्योती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या कुमारी रेवती बागडे या महाराष्ट्र राज्यात न्यायाधीश परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी तसेच चिमुकल्यांनी उत्साहात प्रबोधन गीते सादर करत सर्वांचे मन जिंकले. यामध्ये विशेष चाकणच्या कन्या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राऊत हिने मी टेक्नोसेवी सावित्री यावर उत्कृष्ट असे एकपात्री नाटक केले व सर्वांचे मन जिंकून घेतले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण सवाखंडे, तेजस सपकाळ, पुनम गोरे सुलोचना गाडेकर व संगीता मांजरे हे उपस्थित होते. प्रसिद्ध कवी श्री बाळकृष्ण सवाखंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच प्रतिष्ठानला व संघटनेला खूप शुभेच्छा दिल्या. समाजामधील काही रूढी परंपरा आपण बदलत्या काळानुसार बदलल्या पाहिजेत असा विचार रुजवत, या कार्यक्रमामधून समाजातील सर्व प्रकारच्या महिलांना आदर सन्मान देण्यात आला, असा कौतुकास्पद कार्यक्रम दरवर्षी घेऊन समाजामधील विधवा घटस्फोटीत महिलांना सोबत घेऊन जावे असा सल्ला दिला.
अनिस चाकण शाखेचे कार्याध्यक्ष श्री तेजस सपकाळ यांनी आपल्या मनोगतामध्ये भिडे वाड्याचा उल्लेख करत नक्कीच पुढील वर्षापर्यंत तिथे स्मारक असेल आणि यासाठी आपल्यासारख्या संस्था संघटना झगडतील अशी आशा व्यक्त करत, एकल माता सन्मान या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठानच्या पदाधिकारी अर्चना पिंगळे मॅडम व नीलम धाडगे यांनी उत्कृष्ठ असे सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला अविस्मरणीय केले. पदाधिकारी पल्लवी सवाखंडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले म्हणजेच सर्वांच्या आवडत्या साऊ यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आजच्या आधुनिक स्त्रीने कसे बदलावे याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी अर्चना बिरदवडे यांनी करत प्रतिष्ठानकडून होत असलेल्या अशा आगळ्यावेगळ्या विविध सामाजिक कार्यांचा आढावा सर्वांसमोर मांडला व जास्तीत जास्त महिलांनी व जनतेने प्रतिष्ठानच्या या निराधार महिला व मुली यांच्या सेवा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. अतिशय आनंदी व समाधानी वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.
