
नुकतीच खेड तालुका, ज्येष्ठ नागरिक संघ संचालक मंडळांनी, माजी मुख्यमंत्री खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोविड 19 च्या जागतिक महामारीमुळे रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यामध्ये मिळणारी 50 टक्के सूट मार्च 2020 पासून बंद करण्यात आलेली आहे. सदरची सूट परत चालू करणेबाबतचे निवेदन देऊन प्रयत्न करणे बाबत विनंती त्यांना करण्यात आलेली आहे.
कोविड लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवल्यामुळे भारतामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे. दरम्यानच्या काळात महागाईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दुसरीकडे बँकांमधील ठेवीचे व्याज दर कमी होत आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक नियोजन पूर्णता विस्कळीत झालेले आहे रेल्वे भाड्यात अगोदर मिळणारी सवलत काढून टाकल्याने त्यांना अत्यावश्यक कामासाठी सुद्धा रेल्वे प्रवास करणे दुरापास्त झालेले आहे.
भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष माननीय खासदार श्री राधामोहन यांनी दिनांक १०/०८/२०२२ रोजी एका निवेदनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना अगोदर लागू असलेली रेल्वे भाड्यातील 50 टक्के सवलत परत सुरू करणे बाबत भारत सरकार रेल्वे विभागा त शिफारस केलेली आहे
आदरणीय पवार साहेबांनी सदरचा प्रश्न गंभीर असून, याबाबत मी संसदेमध्ये बोलेन व सदरची सूट पूर्ववत कशी मिळेल याबाबत प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले. सदरचे निवेदन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.मधुकर खेडकर, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब गवते , आदर्श सरपंच श्री. सागर शेलार,संचालक श्री. राजन जांभळे, एकनाथ वाळुंज, श्री. हिरामण पडवळ यांच्या उपस्थित देण्यात आले.
प्रतिनिधी लहु लांडे