
शिक्रापुरात हद्दीत ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी
वाहतूककोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून उपाययोजना
( शिक्रापूर वार्ताहर ) शिक्रापूर ता. शिरुर येथे पुणे नगर महामार्ग तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी प्रशासनाची डोकेदुखी बनत असून अनेकदा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे परंतु सदर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना आता शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर, सणसवाडी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर देखील जातेगाव फाटा तसेच करंदी फाटापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूककोंडी होत असल्यामुळे परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच कामगार त्रस्त झाले आहेत, तर या भागातील कामगार वर्गाला कामावर जाण्यास तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि या रस्त्यावरून प्रवास करत रुग्णांना रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता, अनेकदा पुणे नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा चर्चेचा विषय बनत होता आणि वाहतूककोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता, त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्ग रस्त्यावर कोरेगाव भीमा ते कोंढापुरी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते चौफुला दरम्यान दररोज सकाळी सात ते दहा तसेच सायंकाळी चार ते रात्री आठ वाजे पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालून त्याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहे तर बंदीच्या कामामध्ये सदर रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून वाहन चालकांनी व नागरिकांनी या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.