


प्रतिनिधी लहू लांडे
राजगुरुनगर-पद्मश्री नामदेव ढसाळ हा काचेच्या बंगल्यात एसीत बसून लिहिणारा कवी नव्हता तर तो आयुष्यभर रणांगणावर लढणारा कवी होता असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व समीक्षक मा. केशव सखाराम देशमुख यांनी राजगुरुनगर येथे केले. पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखा व स्व प्रा नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध वाड्मय पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिव व्याख्याते गुलाबराव वळसे, साहित्यीक अरुण बोऱ्हाडे, ॲड. सतिश गोरडे, पुरुषोत्तम सदाफुले, डी. के. वडगावकर, धर्मराज पवळे व साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले पद्मश्री नामदेव ढसाळ कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते तर ते माणसांच्या विद्यापिठातले पदवीधर होते. ढसाळ हा जागतिक कवी होता. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे नवोदित साहित्यीकांसाठी महत्वाची नांदी आहे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी धनाजी घोरपडे, सचिन शिंदे, किरण भावसार, भारत सातपुते, संतोष आळंजकर, डॉ. राजेंद्र माने यांना साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले तर पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा पांडुरंग भोसले यांच्या जीवन गौरव पुरस्कारासह मा.बाळासाहेब सांडभोर, युवारत्न अतुल गार्डी, देशसेवक वीरपत्नी सुनंदा थिगळे, महेंद्र भारती, के.डी.सरोदे, वंदना वाघचौरे, राजन जांभळे, नंद वाव्हळ यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. धर्मराज पवळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले प्रा. कविता कडलग यांनी सूत्रसंचालन तर श्री मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.