

आळंदी ( लहु लांडे ) : वेद जीवनम ग्लोबल रिसर्च फाउंडेशन व प्लास्ट गुरु प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या उद्दिष्टाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले आहे. भारत सरकारच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांमध्ये हायड्रोजन निर्मितीवर भर देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर हायड्रोजन मिशन २०२३ या उपक्रमांतर्गत वर्षाला ५ एमटी हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संदर्भात जागरूकता मोहीम हाती घेण्यात आल्याचे वेद जीवनम फाउंडेशन आणि प्लास्टगुरुचे सीईओ किरण गोडसे यांनी सांगितले.
या कार्यशाळेत एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, डीआरडीओचे निवृत्त संचालक अशोक नगरकर, एआरएआयचे वरिष्ठ संचालक डॉ. एस. एस. ठिपसे, बेस्टयुको सोल्युशनचे डॉ. आशिष पोलकडे, साकार एज्युकेशनचे आशिष केळकर, हॅब बायोमासचे कृणाल जगताप, राहुरी विद्यापीठाचे डॉ. तुलसीदास बसतेवाड, एमआयटीचे डॉ. रत्नदीप जोशी, ओएनजीसीचे पूर्व संचालक तथा सॅनियॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. संजीव कट्टी, इटलीहून ऑनलाइन सहभागी झालेले मॅटियो कोर्टेसी, पॅरिसिको ग्रुप, कुलकोर्प टेक्नॉलॉजिसचे गौरांग कुलकर्णी व ऑटो क्लस्टर पुणेचे शंतनू मुदखेडकर आदींनी हायड्रोजन विषयावर प्रबोधन करणारे प्रात्यक्षिक करून दाखवले. दरम्यान या कार्यासंबंधीची माहिती लेखक अशोकराव टाव्हरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनय चंद्रात्रे व सतीश कुलकर्णी तर रमेश गोडसे यांनी आभार मानले.