मानवता प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…*
मानवता प्रतिष्ठान संतभूमी देहूच्या वतीने दिला जाणारा मानाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,

Spread the love
प्रतिनिधी /देहू. पिंपरी चिंचवड
कोहिंडे खुर्द येथील मुख्याध्यापक श्री. गणेश गावडे सरांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष  प्रा. प्रदीप कदम यांनी  आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वेध भविष्याचा या विषयावर  व्याख्यान देऊन विद्यार्थ्यामध्ये उत्साह निर्माण केला. ग्रामीण भागात प्रामाणिक आणि जीव ओतून काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच आश्रमशाळेतील आदिवासी बांधवाची मुले घडत आहेत याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे गणेश गावडे सरांची आश्रम शाळा असे मत प्रा.प्रदीप कदम यांनी व्यक्त केले. प्रा. कदम म्हणाले की आदिवासी भागातील विद्यार्थी हुशार आहेत पण त्यांना आधुनिक काळातील तंत्रज्ञान अवगत करण्याची आणि पालकांमध्ये जागृती होण्याची गरज आहे.   या प्रसंगी आदर्श शिक्षक म्हणून सूर्यकांत गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आश्रम शाळेतील विविध विषयात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना घडवणे हे एक आव्हानात्मक काम आहे पण कृतीशील, गतिशील आणि नैतिक जबाबदारी पार पाडणारे धडाडीचे नेतृत्व असणारे मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी या आश्रमशाळेचा कायापालट केलेला आहे, असे संतभूमी श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, मानवता प्रतिष्ठानचे अण्णासाहेब सावंत, चिखलगाव आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश वाघोले सर, मांजरे सर, टोकावडे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोपट चव्हाण सर, उद्योजक सतिश आवारी, मानवता प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, तसेच परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करणारे  मानवता प्रतिष्ठानचे सचिव माऊली नवले यांनी मानपत्राचे वाचन केले.
याप्रसंगी आदिवासी रानभाज्या आणि खाद्य संस्कृती महोत्सव संपन्न झाला. विद्यार्थी विविध गुणदर्शन आणि आदिवासी नृत्य सादर झाले. विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले.
प्रा. प्रदीप कदम यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.  पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त करताना आदिवासी आणि ग्रामीण भागात रात्रंदिवस काम करणारे शिक्षक कौतुकापासून कायमच दूर राहतात त्यामुळे मानवता प्रतिष्ठानने पुरस्कार प्रदान करून आमच्या कामाला नक्कीच प्रेरणा दिली आहे असे मत मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी व्यक्त केले. स्वप्निल आप्पा काळोखे, वाघोले सर, चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी सातकर,  कार्यक्रमाचे निवेदन गायकवाड सर यांनी तर आभार अविनाश बिरादार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents