
गायरान बचाव कृती समितीचा १२ डिसेंबर रोजी राजगुरूनगर येथे मोर्चा ….
चाकण : खेड तालुक्यातील ५७ गावांमध्ये एकूण २९२२ गायरानात अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाकडून नोटीसा देण्यात आलेल्या आहेत सदरच्या नोटीसा आल्यापासून सर्व नागरिक अस्वस्थ झालेले आहेत आपली घरे आता जमीनदोस्त होणार की काय ? असा यक्ष प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. याबाबत न्यायालयीन लढा त्याचबरोबर राज्यकर्त्यांसमोर पीडितांची भूमिका मांडण्याचे काम कृती समितीच्या माध्यमातून सुरू झालेले आहे. राज्य सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी खेड तालुक्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी येत्या १२ तारखेला राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू पुतळा येथे जमण्याचे ठरवले आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चा प्रांत कार्यालयाकडे जाणार आहे. प्रांत कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप होणार असून मोर्चेकर्यांची भूमिका शासनासमोर मांडली जाणार आहे.
तरी खेड तालुक्यातील 57 गावातील अतिक्रमणधारकांनी सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल झाल्यानंतर गायरानाचा प्रश्न हा जटिल होत चाललेला आहे. त्यातच याबाबत शासनाने कुठली कागदोपत्री ठोस भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व रोष आहे. काही गावेच्या गावे विस्थापित होण्याची भीती निर्माण झालेली आहे. गायरान बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्याचे काम भविष्यात जोपर्यंत लेखी स्वरूपात कोणताही दिलासा मिळत नाही तोपर्यंत सुरू राहील असे समितीच्या माध्यमातून सांगण्यात आले. यावेळी समितीचे समन्वयक मनोहर वाडेकर, पै. बाळासाहेब चौधरी, ऍड. निलेश आंधळे, काळूराम कड, सचिन पानसरे, गौरव परदेशी आदी उपस्थित होते.
आता भविष्यात शासन याबाबत काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.