

ग्लोबल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या वतीने पठारवाडी झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक भेट
चाकण पठारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कवायती, सांस्कृतिक गीते व स्वातंत्र्य विरांनी राष्ट्रहितासाठी केलेले कार्य तसेच दिलेले बलिदानाचा भाषणांच्या माध्यमातून उजाळा दिला. पठारवाडी शाळेमध्ये आदिवासी समाजाच्या मुलांची संख्या जास्त आहे व त्यांना नियमित आधुनिक साधनसामग्रीची टंचाई भासत असते याचा विचार करत ग्लोबल कॉम्प्युटरच्या संचालिका हर्शदा ठाकूर व नितीन ठाकूर यांनी पठारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणकाचा संपूर्ण सेट भेट दिला. तसेच ही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित विविध उपक्रम राबवत असते या कार्याचे कौतुक पठारवाडीतील ग्रामस्थांनी केले व ठाकूर दांपत्याचा शाळा व्यवस्थापन समिती व पठारवाडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नुकतेच अपघातात दुर्दैवी निधन पावलेले शिक्षक किरण शिंगडे यांच्या स्मृतीस उजाळा देत उपस्थितांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी केले. व उपस्थितांचे आभार सुलाभ पठारे यांनी मानले यावेळी पठारवाडीतील ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.