संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान..

Spread the love
दि. २२. ०२. २०२३
संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान..
पुणे, २२ फेब्रुवारी, २०२३ :- संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘ अमृत परियोजने ’ अंतर्गत ‘ स्वच्छ जल – स्वच्छ मन ’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
‘जल संरक्षण ’ आणि ‘ जल बचाव ’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.
बाबा हरदेवसिंह जी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.
संत निरंकारी मिशनचे सचिव श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास १००० ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे १.५ लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होतील आणि आवश्यकतेनुसार अनेक शाखा निर्धारित क्षेत्रामध्ये एकत्र येऊनही सामूहिक रूपात हा उपक्रम राबवतील.
‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा,मुठा,इंद्रायणी,नीरा,भीमा,कऱ्हा,घोडनदी,पवनानदी,कुकडी नदी, मीना नदी,वेळू नदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण ,नाझरे धरण ,कात्रज तलाव,पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी होणार आहेत.
समुद्र किनारे आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या प्रणालींचा समावेश:- प्रामुख्याने प्राकृतिक जलसाठ्यांच्या क्षेत्रात पडलेला प्लास्टिक कचरा, अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ इत्यादींचा निपटारा करुन समुद्रकिनारे, घाट आणि नदीकिनाऱ्यांची स्वच्छता मिशनच्या स्वयंसेवकांकडून केली जाणार आहे.
या व्यतिरिक्त प्राकृतिक व कृत्रिम जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ इत्यादि जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन दूर करणे, रस्ते व आजुबाजुच्या क्षेत्रांमध्ये फिरण्यासाठी व चालण्यासाठी उपयोगात आणली जाणारी ठिकाणे सुशोभित करण्यासाठी वृक्ष व झुडपांचे रोपण करणे इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत ज्यायोगे पर्यावरण हरित व सुंदर होईल.
जनजागृती अभियानः- जनजागृती अभियानः- या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी मुख्यत: ‘जल संरक्षण’ आणि उत्तम जलप्रथांच्या संदर्भात संदेश दर्शविणारी घोषवाक्ये, बॅनर्स, होर्डिंग्ज इत्यादिंचे प्रदर्शन तसेच पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करणे, पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत जागृती, व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जल संरक्षण’विषयी जागरुकता इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.
ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयास आहे. वर्तमान काळात आपण अशा प्रकारच्या लोक कल्याणकारी परियोजना राबवून आपल्या या सुंदर धरतीला नुकसानीपासून वाचवू शकतो तसेच प्राकृतिक संसाधनांच्या अनावश्यक वापरावरही अंकूश लावू शकतो.

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents