

मागणी मान्य न झाल्यास पुणे ते मुंबई मंत्रालय पायी धडक मोर्चा काढणार – सदाभाऊ खोत
“आझाद मैदान मुंबई” या ठिकाणी गेली ३४ दिवस सुरू असलेले खेड तालुक्यातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन स्थळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. शासनाने लवकर दखल घेतली नाही आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही तर येत्या “महाराष्ट्र दिनी” “१ मे २०२३ पासून पुणे ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा (पदयात्रा) काढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील २५ ते ३० गावातील शेत जमिनीवर भामा आसखेड, चासकमान प्रकल्पांअंतर्गत पुनर्वसन शिक्के गेल्या ४० वर्षांपासून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्के टाकलेली गावे लाभ क्षेत्रात येत नाहीत त्यामुळे पुनर्वसनाचे शिक्के काढून मूळ शेतकऱ्यांचा सातबारा मोकळा करावा, या मागणीसाठी शेतकरी गेली ४० वर्ष संघर्ष करत आहे.
२ मार्च २०२३ पासून खेड तालुक्यातील पुनर्वसनाचे शिक्के टाकलेले गावातील बाधित शेतकरी मुंबई येथील मंत्रालया जवळील “आझाद मैदान” या ठिकाणी बेमुदत उपोषण करत होते. काल सदर मागण्या घेऊन सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयात महसूल पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. त्यावर या संदर्भात विधी व न्याय विभागाच अभिप्राय घेऊन लवकरच संयुक्त मीटिंग घेण्याचे आश्वासन सचिवांकडून देण्यात आले.
मंत्रालयात सचिवांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उपोषण स्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. सदर बैठकीत झालेली चर्चा त्यांना सांगितली. त्यानंतर एकमताने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शासनाने बैठक लावली नाही व त्यातून मार्ग काढला नाही तर येत्या १ मे “महाराष्ट्र दिन” या दिवसापासून पुणे ते मुंबई मंत्रालयावर धडक “पदयात्रा मोर्चा” काढण्यात येणार असून या प्रश्नासंदर्भात न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका सदाभाऊ खोत आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनात सदाभाऊ खोत स्वतः शेतकऱ्यांबरोबर सहभागी होणार आहे.
यावेळी श्री. गजाननराव गांडेकर,(राज्य प्रवक्ते, रयत क्रांती संघटना) मा. श्री. सूर्यकांत काळभोर (जिल्हाध्यक्ष पुणे, रयत क्रांती संघटना), प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, मा. सुभाषराव पवळे (खेड, तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना) आप्पासाहेब कड कुणबी अध्यक्ष, धीरज मुटके माजी नगरसेवक, तसेच महिला वर्ग व पुनर्वसन बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970