
वाबळेवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन
शिक्रापूर वार्ताहर : वाबळेवाडी ता. शिरूर येथील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे विद्यार्थ्यांच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेली संतांची व महापुरुषांची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती.कानडा राजा पंढरीचा, टाळ बोले चिपळीला आदी प्रकारचे अभंग विद्यार्थ्यांनी सुरेख आवाजात गायले. त्याला विद्यार्थ्यांनीच संगीत दिले. सारा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतून बाल दिंडीचे प्रस्थान झाले. विठू नामाचा जयघोष करत सर्व बाल वारकरी वाडीतून मार्गस्थ झाले. विद्यार्थ्यांनी गावातून पताका टाळ मृदंग तसेच डोक्यावर तुळस घेतली होती. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गावाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी शंकराच्या मंदिरात विसाव्याला थांबली. मुलांनी गोल रिंगण करून तालात नाचत गात विठू नामाचा जयघोष चालू ठेवला. विद्यार्थ्यांनी तालासुरात अभंग गायले. यावेळी गावातील सर्व महिला, ग्रामस्थ, पालक आवर्जून मुलांचा बाल दिंडीचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते. महिलांनी व भाविकांनी अतिशय मनोभावे पालखीची व विणेकरी, संतांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची आणि तुळशीधारी बाल वारकऱ्यांची पूजा केली.
रिंगणामध्ये बाल वारकऱ्यांनी छोटे छोटे अतिशय उत्तम खेळ सादर केले. ग्रामस्थ व पालकांमुळे मुलांचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला. मुलांनी उत्तम ठेक्यात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा गजर सुरू केला. त्यानंतर सर्व मुलांनी व ग्रामस्थांनी फुगडीचा आनंद घेतला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, भगवान वाबळे, काळूराम वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत तुषार सिनलकर, प्रास्ताविक किरण अरगडे तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी मानले.
वाबळेवाडी शाळेच्या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916 अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886