

प्रतिनिधी . लहू लांडे
चाकणजवळील पठारवाडी ( ता खेड ) येथील राहणारे सलुन व्यावसायिक सिब्बू हुननेन अली हे गेली दोन वर्षांपासून पठारवाडीच्या शाळेतील आदिवासी, गोरगरीब विद्यार्थ्यांचे केस मोफत कापत असतात. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आदिवासी कातकरी जमातीची बहुतांश मुले शिकत आहेत. परंतू गरीब परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना कपडे तसेच शैक्षणिक साहीत्यही वेळेवर मिळत नाही. अशावेळी केस कापणे, नटणे, सजणे ही तर दूरची गोष्टच त्यामुळे या विद्यार्थ्यांचे केस लांबलचक वाढलेले व कर्दमलेले असायचे. अनेकदा त्यामध्ये उवा,लिखा होत असत. त्यामुळे डोक्यात कोंडा आणि जखमा होत असे याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होत असे, मात्र ही अडचण शिब्बू अली यांना मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी सांगताच त्यांनी ही समस्या सर्व मुलांचे नियमित मोफत केस कापून दूर केली आहे. एवढेच नाही तर रस्त्यावरील भिकारी, अनाथ मुले, माणसे यांचेही मोफत केस कापण्याचे महान कार्य सिब्बू अली करत आहेत. आत्तापर्यंत चाकण परिसरात आणि त्यांच्या मूळ गावी बनारस येथे हजारो विद्यार्थ्यांचे मोफत केस कापण्याचे काम ते अविरतपणे करत आहे. यामध्येच त्यांना समाधान व आनंद मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी चाकणमध्ये केसकर्तन व्यवसायाकरिता नविन दुकान सुरु केले. मात्र त्याचे उद्घाटन अगदी साध्या पदधतीने या आदिवासी मुलांचे केस कापून त्यांच्याच हस्ते रिबिन कापून केले व सर्वांना स्नेहभोजन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांचे व गोरगरीबांचे अशिर्वाद हेच माझ्या व्यवसायाचे यश असल्याचे शिब्बू अली यांनी सांगितले