


प्रतिनिधी लहू लांडे 9766694886
धामणे (ता.खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया हा उपक्रम प्रत्यक्षात राबविल्याने विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राच्या कृतियुक्त अभ्यासास मदत होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाला. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार सभा, आदर्श आचारसंहिता पालन, मतदान अधिकारी नियुक्ती, मतदारांचे ओळख पुरावा, बोटाला शाई लावणे, मोबाईल अॅपवरील ई.व्हि.एम. मशीनवर गुप्त मतदान प्रक्रिया, प्रतिनीधींसमक्ष मतमोजणी आणि निकाल जाहिर करणे या सार्या बाबींचा प्रत्यक्ष कृतियुक्त अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी आला. मुख्यमंत्री पदासाठी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादित चमकलेले विद्यार्थी वेदांत विलास बारवेकर (इ. ७वी) , आयुष दत्तात्रय कोळेकर (इ. ६ वी) आणि हर्षाली किरण कोळेकर (इ.७वी) यांच्यामध्ये लढत झाली. मतदानाच्या दिवशी प्रारंभीच हर्षाली कोळेकरने आपली अनौपचारीक माघार जाहिर करुन आपल्या वर्गातील वेदांत बारवेकरला पाठींबा जाहिर केला. मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या एकूण ९३ मतदानापैकी ५२ मते वेदांतला, ३६ मते आयुषला, ४ मते हर्षालीला आणि १ मत नोटाला पडले. वेदांत बारवेकर बहुमताने मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला. मतदान अधिकार्यांच्या निर्णयानुसार दुसर्या क्रमांकाची मते मिळालेला आयुष कोळेकरला उपमुख्यमंत्री म्हणून जाहिर करण्यात आले. त्यासोबतच हर्षाली कोळेकर सांस्कृतिक मंत्री, दिव्या बाबाजी सातपुते- आरोग्यमंत्री, राज अर्जुन चव्हाण- पोषण आहार मंत्री, समिक्षा सतीश गिर्हे – क्रिडा मंत्री, समृद्धी काळूराम कोळेकर – ग्रंथालय मंत्री, विश्वराज समाधान कोळेकर – बाग मंत्री, वैभवी शिवाजी कोळेकर – परिपाठ मंत्री, शिवम विशाल कावळे – सहल व उपक्रम मंत्री पदावर सर्वानुमते नियुक्त करण्यात आले. संपुर्ण निवडणूक प्रक्रियेचे संयोजन अष्टपैलू शिक्षक अमर केदारी, मंगल निमसे-पिंगळे, गोरख नवले यांनी केले. नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा सन्मान मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक मंत्र्याचे अधिकार आणि कर्तव्याबाबतच्या सूचना अमर केदारी यांनी दिल्या.
