
नगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी कुटुंबातील पंचवीसवर्षीय शीतल कासार हिने धाडसाने गेल्या चार वर्षांत विविध जातींच्या सुमारे हजारांहून अधिक सापांना पकडून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करत जीवदान दिले. सर्पांना पकडून जीवदान देणारी शीतल नगरमधील पहिली महिला सर्पमैत्रीण ठरली आहे.
वाळकीसारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या शीतल हिला घराजवळ किंवा शेतात काम करताना आढळून आलेल्या सापामुळे घरच्यांची घबराटीने उडालेली तारांबळ पाहून साप पकडण्याचे कसब आत्मसात करण्याचे वेड लहानपणीच लागले. कामानिमित्त वडील नगर शहरात स्थायिक झाल्याने तिने नगरमध्ये साप पकडण्याचे तंत्र आत्मसात केले.
कुठेही साप निघाला ही शीतलला आवर्जून बोलावले जाते. नगरमध्ये साप पकडण्याबरोबरच आपल्या गावी वाळकी परिसरातही विषारी असलेले नाग, मन्यार, घोणस या विषारी सापांसह बिनविषारी धामण, तस्कर, अजगर, मांडूळ, कवडय़ा या सापांना लीलया पकडून त्यांना जीवदान दिले आहे. तिने अतिशय धाडसाने काम करताना तीन ते चार वर्षांत विषारी व बिनविषारी असे एक हजारांहून अधिक सापांना पकडून निसर्गात मुक्त केले.
बाहेरगावी साप पकडण्यास बोलावणे आल्यास केवळ दुचाकीसाठी येणाऱया पेट्रोलसाठीचा खर्च घेत आणि जीवावर उदार होत साप पकडून त्यांना निसर्गात मुक्त केले आहे. साप पकडण्याच्या घेतलेल्या खडतर प्रशिक्षणामुळे तिच्यावर आजपर्यंत कोणताही गंभीर प्रसंग ओढावला नाही.
वाळकी येथे दि. 31 ऑक्टोबर रोजी किरण बोठे यांच्या मुरघासात नाग दिसून आला. त्यांनी तातडीने शीतलला फोन करत बोलावून घेतले. त्यानंतर तिने धाडसाने या नागास पकडले. त्यावेळी तिने विविध सापांची माहिती देऊन नागरिकांचे प्रबोधन केले. तर, शीतलच्या या धाडसाचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.