


खेड/चास
प्रतिनिधी सत्यवान शिंदे
लोहे पन्नालाल डे केअर सेंटर
विलेपार्ले मुंबई यांच्या संचालिका सुनिताताई परुळेकर आणि त्यांच्या अकरा महिला सदस्यांच्या टीमने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी या उपक्रमशील शाळेला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी पाणी देणारी जादूची बाहुली, झिरो फायर पिस्तूल त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या मनातील संख्या ओळखणाऱ्या गणितीय उपकरणांची माहिती घेतली. त्याचबरोबर शाळेतील इतर विविध उपक्रमांची देखील माहिती घेतली.विलेपार्ले मुंबई येथे सुमारे चाळीस विद्यार्थी असलेल्या डे केअर सेंटर चे कामकाज पाहणा-या संचालिका सुनिता परुळेकर यांना मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरुनगर यांच्या सहकार्याने बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्याचा योग घडून आला.या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांचे त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले.
तसेच शाळेतील शिक्षकांना विलेपार्ले मुंबई येथे भेट देण्यासाठी देखील विशेष निमंत्रित केले आहे.
दिव्याचा शोधा पासून आजवर दिव्याच्या रुपांमध्ये घडलेले विविध बदल त्यांनी रंजक पथनाट्याच्या माध्यमातून व उद्बोधक पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
दिव्यांचा आश्चर्यकारक प्रवास या सुंदर पथनाट्याने मुले आनंदीत झाली.
त्यांच्या महिला ग्रुपच्या वतीने बारापाटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी शुभंकर तोरण निर्मितीची कार्यानुभव कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक आकर्षक छानसे तोरण बनवले आणि स्वनिर्मितीचा आनंद घेतला. शाळेच्या वतीने उपक्रमांची माहिती देण्यासाठी मुख्याध्यापक संजय नाईकरे त्याचप्रमाणे वैशाली नाईकरे यांनी उत्कृष्ट संयोजन केले.या टीम सोबत मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरुनगर येथील संगणक मार्गदर्शक व समन्वयक प्रशांत तोत्रे उपस्थित होते.नवनवीन प्रार्थना मजेदार बालगीते आणि संस्कारक्षम कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आजचा आनंददायी शनिवार हा उपक्रम संस्मरणीय झाला.