
दावडी येथे शस्त्रास्त्र, नाणी व ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शन
दावडी, ता.३:– दावडी (ता. खेड)येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्र दस्तऐवज व नाण्यांचे प्रदर्शन भरवले होते. दावडी निमगाव रटवडी व दौंडकरवाडी येथील सुमारे १७ शाळेतील विद्यार्थ्यांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
दावडी येथील आम्ही दावडीकर ग्रुप तसेच इतिहास अभ्यासक संतोष चंदने व सुनील कदम यांनी गुरुवार (दि.२) रोजी प्रदर्शनाचे आयोजित केले होते. प्रदर्शनामध्ये मराठा धोप तलवार, फिरंग , दांडपट्टा , गुर्ज व विविध प्रकारच्या तलवारीत नायर , सुसनपत्ता , तेगा , गोलीया , निमचा ,किरच , सिरोही , राजस्थानी , मुघल , कटना , ब्रिटीश , युरोपीअन अशा विविध तलवारी ठेवण्यात आल्या होत्या तसेच
वाघनख , बिचवा , छुरिका , जांबीया , खंजीर , खंजराली , चिलानम तर अफगाण मधले कर्द व पेशकबज यासारखे छोटे व घातक शस्त्र ठेवण्यात आले होते. कट्यारींमध्ये मोघल ,मराठा, विजयनगर ,राजस्थानी बनावटीच्या तर लहान कट्यारी मध्ये स्त्रियांच्या, लहान मुलांच्या, बैठकीच्या कट्यारी ठेवण्यात आल्या होत्या. कुकरी ,संगीन , अंकूश, ठासणीची बंदुक, तोफगोळे, चामड्याच्या व लोह धातूच्या ढाली प्रदर्शनात मांडल्या होत्या. चिलखत , शिरस्त्राण , दस्तान,
माडू, जगनाल या सारखे दुर्मिळ शस्त्र,
विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, भाले, बरची , सांग, इंट, धनुष्यबाण, बाण, त्रिशूल, शुल,गुप्ती व अडकित्ते ठेवण्यात आले होते. अनेक संस्थानांचे स्टॅम्प पेपर तसेच दस्तऐवज व ऐतिहासिक नाणी प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
चित्रपटात किंवा दूरदर्शन मालिकेत पाहावयास मिळणारी अथवा कथा कादंबऱ्यात वाचलेली शस्त्रे अगदी जवळून पाहताना विद्यार्थी हरखून गेले होते. संतोष चंदने व सुनील कदम यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. आम्ही दावडीकर ग्रुपचे सदाशिव अमराळे,
बाबासाहेब दिघे, संतोष गाडगे, राहुल जाधव, गणेश बैरागी, विठ्ठल फडतरे, रमेश म्हसाडे, संतोष बेल्हेकर, राजेश कान्हूरकर, दादाभाऊ डुंबरे यांनी नियोजन केले. शिक्षक वृंद यांचेही सहकार्य लाभले. यावेळी सरपंच माधुरीताई खेसे, उपसरपंच अनिल नेटके, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई सातपुते, धनश्री कान्हूरकर, संभाजी घारे, संतोष गव्हाणे, हिरामण खेसे, विजयसिंह शिंदे पाटील, दत्तात्रेय ओंबळे, निलेश आंधळे, सुरेश डुंबरे, साहेबराव दूंडे, पांडुरंग दूंडे, बाबाजी गाडगे व प्रताप लोणकर उपस्थित होते. नवनाथ कदम, गणेश म्हसाडे, अभिजित डुंबरे, आशिष शितोळे व जयहिंद म्हसाडे, श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालयाचे शिक्षक वृंद यांनी नियोजनासाठी मदत केली.